टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूविरोधात तक्रार दाखल, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आहे आरोप

टीम इंडियाचा माजी खेळाडू एका आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आला आहे. हरियाणामधील एका आत्महत्येप्रकरणी माजी क्रिकेटपटू आणि डीएसपी जोगिंदर शर्माविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे की, जोगिंदर शर्मा सदर व्यक्तीवर घर रिकामे करण्यासाठी दबाव टाकत होता. जोगिंदर शर्मा याच्यासह आणखी पाच जणांचे तक्रारीत नाव आहे.

हे प्रकरण हिसारच्या डाबरा गावातील आहे. या गावातील एका तरुणाने 1 जानेवारी रोजी मालमत्तेच्या वादातून गळफास घेऊन आत्महत्या केली. पवन असे त्या तरुणाचे नाव असून तो 27 वर्षांचा होता. 2 जानेवारीच्या रात्री सहा आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये जोगिंदर  शर्मा व्यतिरिक्त अजय बीर, ईश्वर झाझरिया, प्रेम खाती, अर्जुन आणि हॉकी प्रशिक्षक राजेंद्र सिहाग यांचा समावेश आहे.

हे प्रकरण 2020 च्या दुसर्‍या प्रकरणाशी संबंधित आहे. पवनची आई सुनीता यांनी सांगितले की, मालमत्तेच्या वादातून ऑक्टोबर 2020 मध्ये पवनच्या कुटुंबीयांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात जोगिंदर शर्मा व्यतिरिक्त इतर पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ते आरोपी त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत होते. त्यानंतर पवनच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र आरोपींच्या दबावामुळे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला नाही. त्यानंतर जोगिंदर शर्मा यांची डीएसपी पदावर नियुक्ती करण्यात आली. हे सर्व आरोपी गेल्या काही वर्षांपासून पवन आणि त्याच्या कुटुंबीयांचा  छळ करत होते. काही दिवसांपूर्वी अजयबीर आणि त्याचा मुलगा अर्जुन आले आणि त्यांनी मुलगा पवनला घर सोडण्यास सांगितले. त्यानंतर दबावाखाली त्याने स्वत:चा जीव घेतला. यात जोगिंदर शर्मा याने देखील आरोपींना साथ दिल्याचे पवनच्या आईचे म्हणने आहे.

जोगिंदर शर्मा इंडियासाठी केवळ 4 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळला आहे. त्याने 2004 मध्ये हिंदुस्थानसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2007 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.