देशातील निम्मे लोक अनफिट

धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. नियमित व्यायाम करत नसल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. यासंदर्भात ‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’चा अहवाल नुकताच प्रकाशित झालाय. हा अहवाल काहीसा चिंताजनक आहे. कारण अहवालानुसार हिंदुस्थानात 50 टक्के लोक शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त नाहीत. ते एक तासही व्यायाम करत नाहीत. विशेष म्हणजे या आकडेवारीत स्त्रियांची संख्या जास्त आहे. अहवालानुसार, 57 टक्के स्त्रिया आणि 42 टक्के पुरुष तंदुरुस्त नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अशा प्रौढ लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, टाइप 2 मधुमेह, स्मृतिभ्रंश, कोलन आणि स्तनाच्या कर्करोगांचा धोका आहे.

डब्ल्यूएचओ काय म्हणते…
जागतिक आरोग्य संघटनेच्या मागदर्शक सूचनांनुसार, प्रौढ वर्गातील लोकांनी दर आठवडय़ाला 150 मिनिटं शारीरिक हालचालींचे व्यायाम किंवा दर आठवडय़ाला 75 मिनिटं तीव्र स्वरूपाचे व्यायाम करावे. जर कुणाचा यापेक्षा कमी व्यायाम होत असेल, तर ते शारीरिकदृष्टय़ा चांगले नाही. हिंदुस्थानातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या या मागदर्शक सूचनांचे पालन करताना दिसत नाही.

60 टक्के लोक अनफिट
2000 मध्ये 22 टक्के हिंदुस्थानी प्रौढ व्यक्ती निरोगी नव्हते, 2010 मध्ये हे प्रमाण 34 टक्के होते. तर 2022 मध्ये हा आकडा 49.4 टक्क्यापर्यंत वाढला. जर अशीच परिस्थिती राहिली तर 2030 पर्यंत हिंदुस्थान सुमारे 60 टक्के लोकसंख्या ही शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त नसेल़ जागतिक स्तरावर 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या पुरुष-महिला, अशा दोघांमध्ये शारीरिक हालचाली कमी होताहेत.