गुरुग्राम पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपविरोधात दाखल केला एफआयआर

गुरुग्राममध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. गुरुग्राम पोलिसांनी एका प्रकरणात चक्क व्हॉट्सअॅप आणि त्याचे नोडल अधिकारी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका प्रकरणात तपासाशी संबंधित कायद्याच्या नियमांचे पालन केलेले नाही. फसवणूक आणि गुन्हेगारी कटाअंतर्गत एका प्रकरणात पोलिसांना व्हॉट्सअॅपकडून माहिती हवी होती, मात्र त्यांच्याकडून मिळाली नाही. पोलिसांनी दावा केला आहे की, व्हॉट्सअॅपने महत्वपूर्ण इलेक्ट्रॉनिक पुरावे थांबवून तपासात बाधा आणली आहे. त्या पुराव्यांमुळे आरोपींची ओळख पटवण्यास मदत मिळू शकते. एफआयआरनुसार, व्हॉट्सअॅपकडून मागवण्यात आलेली माहिती देण्यासाठी नकार देणे हे कायद्याच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यांनी कायदेशीर कारवाईत बाधा घातली आहे.

पोलिसांनी 17 जुलै 2024 रोजी व्हॉट्सअॅपला एक नोटीस पाठवली होती. त्यात एका प्रकरणात काही फोन नंबरची माहिती माहितली होती. त्यावर व्हॉट्सअॅपने 19 जुलै रोजी गुन्हेगारी वृत्तीचे स्वरुप मागितले. पोलिसांनी 25 जुलैला त्यावर उत्तर पाठविले. त्यात आवश्यक माहितीचा पुनरुच्चार करण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपने मागितलेल्या माहितीबाबत विरोध दाखवला. 23 ऑगस्टला त्यावर विस्तृत उत्तर मागविण्यात आले. प्रकरण पाहता त्यावर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. त्यानंतरही व्हॉट्सअॅपने 28 ऑगस्ट रोजी विनंती नाकारली. पोलिसांनी सांगितले की, व्हॉस्अॅपचे वर्तणूक पाहून त्यांनी आरोपी व्यक्तींची जाणीवपूर्वक मदत केली आहे. त्यामुळे महत्वपूर्ण इलेक्ट्रॉनिक पुरावे जाणीवपूर्वक दाबण्यासाठी आणि तपासात बाधा आणण्यासाठी सहभाही आहे.