गुजरात आता गुन्हेगारीची राजधानी बनत चालल्याचे चित्र आहे. हजारो कोटींचे ड्रग्ज पकडल्यानंतर आता गुजरातमध्ये डिजिटल अरेस्ट रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 18 जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अनेक खुलासे समोर आले असून या टोळीने तब्बल 5 हजार कोटींची फसवणूक केली असून ते पैसे चीन आणि तैवानला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. ही टोळी गेमिंग अॅप, शेअर बाजारात गुंतवणूक आणि फसवणुकीसाठी डिजिटल अटक अशा युक्त्या वापरत होती.
आरोपींमध्ये चार तैवानचे नागरिक असून उर्वरित 14 अहमदाबाद-वडोदरासह गुजरातमधील आहेत. या टोळीवर देशभरात सुमारे 450 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सीबीआय आणि सायबर क्राईमचे अधिकारी असल्याचे दाखवून फसवणूक करायचे आणि त्यातून मिळालेले पैसे तैवानला पाठवायचे. दरम्यान, माफियांनी रोज दहा कोटी रुपये पाठवण्याचे टार्गेट दिले होते.
प्रथमच हाती लागली डार्प रूम
तैवान आणि चीनचे माफिया डिजिटल फसवणुकीत आघाडीवर होते. देशभरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी माफियांनी वडोदरा-दिल्ली-मुंबई-बंगळुरूमध्ये तब्बल चार डार्प रूम तयार करण्यात आल्या होत्या. याच अड्डय़ातून मोबाईल आणि नेट बँकिंगच्या मदतीने फसवणूक केलेले पैसे काही सेपंदांत चीन, तैवान आणि दुबईला पाठवले जात होते. सायबर पोलिसांच्या पहिल्यांदाच अशा प्रकारची डार्प रूम हाती लागली आहे.
अशी करायचे फसवणूक
आरोपी सीबीआय आणि सायबर क्राईमचे अधिकारी असल्याचे भासवून आपले लक्ष्य गाठायचे आणि पूर्ण करायचे. या टोळीचे गुंड रोज सुमारे दीड कोटी रुपये कमवायचे आणि तैवानला पाठवायचे. 761 सिमकार्ड, 120 मोबाईल, 96 चेकबुक, 92 डेबिट कार्ड आणि 42 बँक पासबुक इत्यादी साहित्य या टोळीच्या अड्डय़ांमधून हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान, या टोळीने अहमदाबादच्या पॉश भागातील एका वृद्ध जोडप्याला दहा दिवस डिजिटल अटकेत ठेवून 79.34 लाख रुपये उकळले होते. दरम्यान, तैवान टोळीचे गुंडही दोन वेळा टुरिस्ट व्हिसावर हिंदुस्थानात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
– या टोळीची गुगल शीट गुजरात पोलिसांनी पकडली. त्यात दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईतील हॉटेल, टॅक्सी आणि जेवणाची बिले सापडली. यावरून तैवानमधील माफिया टोळीचे गुंड हिंदुस्थानात आल्याचा सुगावा हाती लागल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.