गुजरातची लाडकी भ्रष्टयुती, काँग्रेसचे राज्यभरात पोस्टर अभियान

महाराष्ट्र काँग्रेसने महायुतीविरोधात ‘गुजरातची लाडकी भ्रष्टयुती’ या थीमवर पोस्टर अभियान सुरू केले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी रातोरात याचे पोस्टर्स लागले. अलीकडेच सुरू झालेल्या ‘गुजरातची लाडकी भ्रष्टयुती’ या चित्ररथ अभियानाला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे, काँग्रेसने महाराष्ट्राऐवजी गुजरातला प्राधान्य देणाऱ्या ‘भ्रष्टयुती’ ला लक्ष्य करण्याचे ठरवले आहे.

राज्यभरात लावलेल्या पोस्टरांमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेताना दाखवले आहे. काँग्रेसचा आरोप आहे की या प्रकल्पांच्या स्थलांतरामुळे राज्याला ₹7.5 लाख कोटींचे नुकसान झाले असून, 5 लाख रोजगार राज्याला गमवावे लागले आहेत. त्यामुळे या युतीला ‘गुजरातची लाडकी भ्रष्टयुती’ असे नाव देण्यात आले आहे.

तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी आणि प्रकल्प बाहेर जाण्याच्या मुद्द्यांवर काँग्रेसने भ्रष्टयुतीवर केलेल्या या टीकेमुळे युतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्याच्या निवडणुका जवळ येत असताना, काँग्रेसचा हा प्रचार भ्रष्टयुतीला बॅकफूटवर ढकलत आहे.