गुजरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक धक्कादायक घटना उघड होत आहे. येथील दाहोद मतदारसंघात येणाऱ्या महिसागर जिल्ह्यात भाजप नेत्याच्या मुलाने ईव्हीएम मशीन ताब्यात घेतलं आहे. तसंच, या वेळी त्याने ईव्हीएण माझ्या बापाची आहे, असं म्हणत या प्रकाराचं लाईव्ह चित्रीकरणही केलं.
या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, ही घटना व्हायरल झाल्यानंतर उसळलेल्या संतापाच्या लाटेमुळे संबंधित तहसीलदार अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. या नेत्याचं नाव विजय भाभोर असं आहे. त्याचे वडीलही भाजप नेते आहेत. विजय याने आचारसंहिता लागू असतानाही महिसागर इथल्या मतदान केंद्रात घुसखोरी केली आणि ईव्हीएम ताब्यात घेतलं. निवडणूक आयोगाला अर्वाच्च शिवीगाळ करून हा सगळा प्रकार लाईव्ह प्रसारितही केला. ईव्हीएम आपल्या बापाचं असल्याचं तो या लाईव्ह दरम्यान बोलताना दिसला.
दरम्यान, गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोषी यांनी या प्रकाराचा निषेध केला असून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. महिसागर येथील संतरामपूरमधल्या बूथ क्रमांक 220 (परथमपूर) येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याने काँग्रेसने पुन्हा मतदान घ्यावं अशी मागणी केली आहे.