दिवसभर रस्त्यावर भीक मागायचे, रात्रीचा मुक्काम हॉटेलमध्ये करायचे!

काही महिन्यांपूर्वी इंदूरमध्ये दोन महिन्यात 2.5 लाखांची कमाई करणाऱ्या इंद्रा बाई नामक भिकारी महिलेला पोलिसांनी अटक केली होती. महिलेची संपत्ती पाहून पोलिसही चक्रावले होते. असाच प्रकार इंदूरमध्ये पुन्हा उघडकीस आला असून भीक मागून हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीक मागणाऱ्या 11 लहान मुलांसह 22 जणांच्या एका समुहाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीक मागणाऱ्यांचा एक ग्रूप शहरातील एका हॉटेलमध्ये राहत होता. या ग्रूपमध्ये 11 लहाण मुलं आणि तितक्याच महिला होत्या. हे सर्व शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दिवसभर भीक मागायचे आणि रात्री हॉटेलमध्ये झोपायाचे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

सर्व भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या मुळस्थानी राजस्थानला पाठवण्यात आले आहे. तसेच भीक मागणाऱ्यांना कोणीही आश्रय देऊ नये, असा सक्त आदेश काढण्यात आला असून शहरातील सर्व हॉटेल, लॉज आणि निवारागृह संचालकांना तशी तंबी देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.