RATAN TATA : टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक ते टाटा सन्सचे अध्यक्ष, रतन टाटा यांचा प्रेरणादायी प्रवास

पैशांपेक्षा माणुसकीच्या श्रीमंतीला अधिक महत्व देणारे व्यक्तीमत्व म्हणजे रतन टाटा. तळागाळातील जनतेच्या वेदना जाणून घेणारा दिलदार माणूस. उद्योगपती म्हणून कुठलाही बडेजाव न दाखवता सर्वसामान्यांसाठी मदतीचा हात पुढे करणारे रतन टाटा. दोन दिवस मृत्यूशी झुंज देत बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने हिंदुस्थानचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. एक महान व्यक्तीमत्व हिंदुस्थानने गमावले आहे. टाटा इंडस्ट्रीडमध्ये सहाय्यक ते टाटा सन्सचे अध्यक्ष हा रतन टाटांचा प्रवास कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

देशातील सर्वात जुने उद्योगपती घराणे असलेल्या टाटा समूहाला यशाच्या शिखरावर पोहचवण्याचे कार्य रतन टाटा यांनी केले. हा प्रवास सोपा नव्हता. रतन टाटा 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून टाटा समूहात रुजू झाले. त्याच वर्षी त्यांनी टाटा इंजिनिअरिंग आणि टाटा मोटर्सच्या जमशेदपूर प्लांटमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. विविध कंपन्यांमध्ये सेवा दिल्यानंतर 1971 मध्ये त्यांची राष्ट्रीय रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती झाली. 1981 मध्ये ते टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनले.

1991 पासून ते 28 डिसेंबर 2012 रोजी निवृत्त होईपर्यंत रतन टाटा हे टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे अध्यक्ष होते. या काळात ते टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या प्रमुख टाटा कंपन्यांचे अध्यक्ष होते. हिंदुस्थान आणि परदेशातील विविध संस्थांशीही त्यांचा संबंध होता. रतन टाटा हे मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळावरही होते.

केवळ इतकेच नव्हे तर सर रतन टाटा ट्रस्ट, अलाईड ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्टचे रतन टाटा अध्यक्ष होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या व्यवस्थापन परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठ आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळावरही काम केले आहे. उद्योग क्षेत्रातील आणि देशसेवेच्या भरीव कार्यासाठी रतन टाटा यांना पद्म विभूषण, पद्म भूषण, ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर आणि इंटरनेशनल हेरिटेज फाउंडेशनचा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड आदी प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.