अठरा देशांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवात, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ची यशस्वी 15 वर्षे

मानवतेचे कवी कुसुमाग्रज यांच्या अभिजात साहित्याने मराठी रसिकांच्या मनात कायमचे घर केले आहे. त्यांनी समाजपरिवर्तनासाठी मराठी माणसाला क्रांतीचे बळ दिले, ते जेव्हाही त्र्यंबकेश्वरजवळील पाडय़ांवर आदिवासी बांधवांच्या भेटीसाठी जात, तेव्हा पिशवीभर पुस्तके त्यांच्या हाती ठेवत, याच कृतीतून प्रेरणा घेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही वाचनासाठी मोफत ग्रंथपेटय़ा उपलब्ध करून देणारी योजना आकाराला आली. हजारो हात जोडले जावून पंधरा वर्षात ती 18 देशांमध्ये बहरली. या माध्यमातून हजारो मराठी माणसे वाचनाचा आनंद घेत आहेत. हे एका योजनेचे नाही, तर तळमळीने वाचन संस्कृतीचा जागर करणाऱया मराठीप्रेमींच्या प्रामाणिक प्रयत्नांचे यश आहे.

भाषा हा केवळ अभिमानाचा नाही, तर समाजाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा महत्त्वाचा घटक आहे, म्हणूनच वाचन संस्कृतीचा जागर करण्यासाठी ग्रंथ तुमच्या दारी योजना कुसुमाग्रज प्रतिष्ठानने सन 2009 मध्ये सुरू केली. अनेकजण वाचनालय दूर असल्याने वाचनाचा आनंद घेवू शकत नाहीत, हे लक्षात घेवून त्यांना घरपोच पुस्तके मिळावीत, या उद्देशाने मराठीतील दर्जेदार कथा, काव्य संग्रह, कादंबरी, अनुवादित अशा 25 पुस्तकांचा संच एका पेटीतून एका कुटुंबास मोफत उपलब्ध करुन दिला जातो. दर तीन महिन्यांनी ते गट ग्रंथपेटय़ा आपापसात बदलून घेतात. ही योजना अल्पावधीतच वाचकप्रिय ठरली. शंभर पुस्तकांच्या पेटय़ाही तयार करण्यात आल्या. मोठय़ांसाठी, तसेच बाल आणि तरुणाई विभागही यात निर्माण केले.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे ग्रंथांचे आज प्रकाशन

मराठी भाषा गौरव दिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नव्या 51 पुस्तकांचे प्रकाशन गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे यांच्यावरील मौल्यवान ग्रंथांचा समावेश आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाने आतापर्यंत 697 ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मंडळ वर्षभरात छपाई करून तयार केलेली पुस्तके दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करते. ही मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. या वर्षीच्या 51 ग्रंथांमध्ये ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमाले अंतर्गत रामदास भटकळ यांनी लिहिलेले पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे चरित्र प्रकाशित होईल.

नाशिकमध्ये कुसुमाग्रज यांना अभिवादन

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांचे निवासस्थान फुले आणि विद्युत रोषणाईने सजले आहे. येथे दरवर्षीप्रमाणे उद्या गुरुवारी, 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांना अभिवादन करण्यासाठी नाशिककर उपस्थित राहतील. प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी आठ वाजता प्रतिमापूजन होणार आहे.

ज्ञानपीठ विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे जलतरण तलावाशेजारी असलेले निवासस्थान म्हणजे साहित्यप्रेमींसाठी ज्ञानमंदिर आहे. याच ठिकाणी कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने सामाजिक, सांस्कृतिक प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रतिष्ठानची सन 1990 ला स्थापना झाली. येथे कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.