छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली की नव्हती, यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. त्यात श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी आणखी तेल ओतले आहे. ‘छत्रपती शिवरायांनी त्या काळी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली,’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
मुंबईतील एका गणेश मंडळाला भेट दिल्यानंतर गोविंददेव गिरी यांनी हे वक्तव्य केल्याने वादाचा भडका उडाला. याच गोविंददेव गिरी यांनी 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती.
गोविंददेव म्हणाले की, संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे असे मानून छत्रपती कार्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान जेव्हा आर्थिक चणचण भासत असे तेव्हा आज ईडी जशी सक्तीने वसुली करते तशीच शिवाजी महाराजांनी तेव्हा काही लोकांकडून सक्तीची वसुली केली. हिंदवी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता त्याची सक्तीची वसुली केली, असे ते म्हणाले.
महाराज लुटारू नव्हते – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोविंददेव यांच्या विधानाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणजे ते लुटारू नव्हते. नादीरशाहने सरसकट लूट केली होती. तसे महाराजांनी केले नाही. पारेख कुटुंबात मृत्यू झाला होता, तिथे जाऊ नका असे महाराजांनी सैनिकांना सांगितले होते. त्यांनी आधी सुरतला नोटीस पाठवून खंडणी मागितली. त्यानंतर सुरत लुटण्याचा निर्णय घेतला. त्याकाळचा ‘खंडणी’ शब्द आणि आजकालच्या ‘खंडणी’त फरक आहे.’