महायुती सरकारच्या फसवाफसवीची पोलखोल, ‘लाडक्या बहिणी’च्या चुलीवरील फोडणी महागली 

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमा शुल्कात केलेल्या प्रचंड वाढीमुळे महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोजवारा निघाला आहे. लाडक्या बहिणीच्या चुलीवरील फोडणी महागली आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली.

महिलांचे आर्थिक मजबुतीकरण करण्याचा गाजावाजा करत महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. राज्याच्या तिजोरीत ठणठणाट असतानाही केवळ विधानसभा निवडणुकीसाठी मतांवर डोळा ठेवून ही योजना आणली गेली. परंतु भाजपमुळेच त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्यासाठीच भाजपने खाद्यतेलाच्या सीमा शुल्कात 12.5 टक्क्यांवरून 32.5 टक्के इतकी वाढ केली आहे. सीमा शुल्कात वाढ झाल्याने खाद्यतेल महागले आहे. चुलीवरील फोडणीच महागल्याने गृहिणी बहिणींचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. एकीकडे लाडकी बहीण म्हणून बहिणीच्या खात्यात पैसे जमा करून खोटा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे मात्र बहिणीच्या घरातच दरोडा टाकून लुटायचे. अशा दुहेरी लुटारू भूमिकेमुळे राज्य सरकारच्या फसव्या लाडकी बहीण योजनेचे पितळ उघडे पडले आहे, असा टोला त्यांनी लगावला.