मुख्यमंत्र्यांना माथेरानचा ‘स्वच्छता दूत’ नावडता; पर्यावरण रक्षकांना भेटण्यास  मंत्र्यांना वेळ नाही, हिलस्टेशनवर झाले बाटल्यांचे डोंगर

निवडणुकांवर डोळा ठेवत राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचण्यासाठी पैसे देऊन नियुक्त केलेले मुख्यमंत्र्यांचे ‘योजना दूत’ सध्या सरकारचे लाडके झाले आहेत. पण स्वखर्चाने इको सेंसेटिव्ह माथेरानच्या पर्यावरणाचे संवर्धन करणाऱया ‘स्वच्छता दूतां’ना भेटण्यास सरकारकडे वेळ नसल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांकडून हल्ली पिण्याच्या सीलबंद पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर होतो. पाणी पिऊन झाल्यावर रिकाम्या बाटल्या पर्यटक कुठेही आणि कशाही फेकून देतात. त्यामुळे माथेरानमध्ये सर्वत्र प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच झालेला दिसतो. जंगल, दऱया, लेकच्या परिसरात बाटल्यांचे ढीग साचलेले दिसतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱहास रोखण्यासाठी माथेरानमध्ये घोडय़ाचा व्यवसाय करणारा राकेश कोकळे हा तरुण पुढे आला. त्याने पंधरा तरुण कार्यकर्त्यांची फौज तयार केली आणि माथेरानमधील प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करण्यास सुरुवात केली.

तीस लाख बाटल्या

माथेरान प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी हे तरुण बारा-चौदा वर्षांपासून झगडत आहेत. माथेरानच्या वेगवेगळ्या भागांतील पंचवीस ते तीस लाख प्लॅस्टिकच्या बाटल्या या तरुणांनी गोळा केल्या आहेत. या कामाची दखल घेऊन पर्यावरणप्रेमी रमेश कोकळे यांचा ‘स्वच्छता दूत’ हा पुरस्कार देऊन स्वयंसेवी संस्थेने गौरवही केला आहे. या माहिमेला सरकारची मदत मिळवण्यासाठी रमेश कोकळे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तसेच पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

निवेदन दिले, पण ऐकूनच घेतले नाही

माथेरान इकोसेंसेटिव्ह झोन आहे. त्यामुळे या जंगलाला प्लॅस्टिकच्या विळख्यातून सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’वर भेट घेतली. पण मुख्यमंत्र्यांनी पूर्ण ऐकून घेतले नाही. निवेदन घेतले आणि पंधरा-सोळा सेपंदात माझी बोळवण केली. पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रालयात भेट घेतली. पण त्यांनी माझे काही ऐकून घेतले नाही, अशी खंत राकेश कोकळे यांनी व्यक्त केली.