नवरात्रीनंतर वर्षभर मजुरी करावी लागते; गोंधळी समाजाच्या व्यथा

नवरात्रोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण असून, घरोघरी देवीचा जागर करण्यासाठी गोंधळाचे आयोजन केले जात आहे. देवीचा जागर करण्यासाठी गोंधळी कलावंतांना घरी आमंत्रित करून त्यांच्याकरवी आईचा जागर केला जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भरभरून दान दिल जातं. या दानावर काही महिन्यांचा उदरनिर्वाह भागतो. मात्र, त्यानंतर वर्षभर मजुरी करूनच आम्हाला घर चालवावे लागते, अशा व्यथा गोंधळी कलावंतांनी मांडल्या आहेत.

लोककला या प्रकारात कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात गोंधळी कलावंतांना मानाचे स्थान दिले जाते. त्यांना घरी बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यांना भरभरून दान दिले जाते. मात्र, नवरात्रोत्सवानंतर या कलावंतांना जगण्यासाठी झगडावे लागते. काहीजणांवर आर्थिक गरजा भागवण्यासाठी वेळप्रसंगी शेतमजुरी करावी लागते.

नवरात्राची निमित्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक
कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. नवरात्रोत्सव म्हटलं की गोंधळ हा आपसुकच आला. त्यामुळे सध्या शहरासह गावखेड्यांमध्ये लाल रंगाचा अंगरखा, गळ्यात कवड्यांची माळ, हळदीने भरलेला मळवट असा पोशाख परिधान केलेले गोंधळी पाहायला मिळत आहेत. देवीचे आवडते वाद्य संबळ आणि त्याच्या जोडीला तुणतुणे, टाळ्यांच्या गजरात गोंधळी कलावंत ‘उघे गं अंबे उधे’ म्हणत देवीचा जयजयकार करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नवरात्रोत्सवात अनेकांच्या घरी घटस्थापना केली जाते. त्यामुळे दररोज देवीची आरती आणि गीते सादर करण्यासाठी या गोंधळी कलावंतांना घरी आमंत्रित केले जाते. प्रत्येक गोंधळी कलावंतांना गावकी वाटून दिली आहे. घरी जाऊन देवीची गीते किंवा आरती केल्यावर पैसे, धान्य स्वरूपात दान दिले जाते. मात्र, नऊ दिवस संपल्यानंतर उदरनिवार्हासाठी काही गोंधळींनी शेतात मोलमजुरी करून आर्थिक गरजा भागवाव्या लागतात, असे सासवड येथील मनोज गोंधळी यांनी सांगितले.

ही कला लुप्त होण्याची भीती
सध्या तरुणवर्ग हा सुशिक्षित झाला असून, तो नोकरीच्या मागे पळत आहे. त्यामुळे तरुणांना घरोघरी जाऊन गाणी म्हणणे, भिक्षा मागण्याची लाज वाटते. गेल्या काही वर्षांत धार्मिक कार्यक्रम घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ही कला लुप्त भीती, गोंधळी संजय चव्हाण यांनी व्यक्त केली.

पाच-सहा महिने पुरते धनधान्य
नवरात्रीच्या दिवसांत घरी बोलावून नागरिक दान देत असतात. काहीजण हे गहू, तांदूळ, डाळ यांसह अन्य साहित्याचे दान देतात. हे धान्य नवरात्रोत्सवाच्या नंतर पाच-सहा महिने पुरते. तर, काहीजण पैशांचे दान देतात. या नऊ दिवसांत साधारण वीस ते पंचवीस हाजारांचे दान मिळते. त्यातून काही महिने उदरनिर्वाह भागतो, असेही मनोज गोंधळी यांनी सांगितले.

प्रत्येक गोंधळ्यांना गावकी वाटून दिलेली असते. गावगाडा मोठा असेल तर अधिक प्रमाणात काम मिळते. सध्या मी सासवड येथे देवी आईचा जागर करत असून, एका दिवसाला मी 50 ते 55 घरांमध्ये जाऊन आईची गीते, आरती असे धार्मिक कार्यक्रम करत आहे.
– मनोज गोंधळी (गोंधळी, सासवड)