पालिका आणि रेल्वेतील समन्वयाअभावी जोडकामात झाला गोंधळ, सत्यशोधक समितीचा अहवाल; अधिकाऱयांना मात्र क्लीन चिट

अंधेरी येथील गोखले ब्रीज आणि बर्फीवाला ब्रीज यांच्यामध्ये झालेला उंचीचा गोंधळ पालिका आणि रेल्वे यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच झाल्याचा ठपका सत्यशोधक समितीकडून ठेवण्यात आला आहे. या अहवालात अधिकाऱयांना मात्र क्लीन चिट देण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांना सत्यशोधक समितीकडून सादर करण्यात आला.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण 26 फेब्रुवारीला करण्यात आले. यात बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार होता. मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची 2.8 मीटरने अधिक राहिल्याचे समोर आले होते. यामुळे पालिकेला मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून हे दोन्ही पूल जोडण्याचे काम पालिकेला करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आयआयटी आणि व्हीजेटीआय या तज्ञ संस्थांचा कामासाठी सल्ला घेण्यात आला. मात्र या प्रकारामुळे पालिकेला टीकेला सामोरे जावे लागल्याने या प्रकाराला जबाबदार कोण यासाठी सत्यशोधक समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच आयुक्तांकडे सुपूर्द केला.