जास्तीत जास्त मुले जन्माला घाला! चंद्राबाबू यांचा राज्यातील जनतेला अजब सल्ला 

वृद्धांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जोडप्यांनी जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, असा अजब सल्ला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील जनतेला दिला. तसेच वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येवर देखील त्यांनी चिंता व्यक्त केली.

एका कार्यक्रमात चंद्राबाबू नायडू म्हणाले, ‘राज्यातील अनेक खेडगावांमध्ये केवळ वृद्ध लोक आहेत. कारण तरुण पिढी देशाच्या विविध भागात आणि परदेशात स्थलांतरित झाले आहेत. लोकसंख्येत घट आणि तरुणांचे स्थलांतर राज्यासाठी धोकादायक ठरू शकते. लोकसंख्या व्यवस्थापनअंतर्गत कायदा आणण्याचाही विचार सुरू असून यामध्ये मोठय़ा कुटुंबांना प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. अधिक मुले असलेल्या कुटुंबांना आम्ही प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहोत. दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवण्यास प्रतिबंध करणारा पूर्वीचा कायदा आम्ही रद्द केला आहे. दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता याव्यात यासाठी सरकार कायदा आणण्याचा विचार करत आहे.’

…तर जपान, युरोपसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल

राज्यातील प्रजनन दर 1.6 वर आला आहे. जो राष्ट्रीय सरासरी 2.1 पेक्षा खूपच कमी आहे. ही परिस्थिती दक्षिणेकडील राज्यांना वृद्ध लोकसंख्येच्या समस्येत ढकलू शकते. या दिशेने पावले न उचलल्यास आंध्र प्रदेशला जपान आणि युरोपसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी चिंता चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली