मुंबईतच घर हवे! गिरणी कामगार आज ऑगस्ट क्रांती मैदानावर धडकणार

गिरणी कामगारांचे संपूर्ण पुनर्वसन मुंबईतच झाले पाहिजे, राहिलेल्या वंचित गिरणी कामगारांना म्हाडाचा फॉर्म भरण्याची संधी द्यावी, या आग्रही मागणीसाठी गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता ग्रॅण्ट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ऑगस्ट क्रांती मैदान येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना यासारख्या योजनांवर मिंधे सरकार कोटय़वधींची उधळपट्टी करतेय, परंतु हजारो गिरणी कामगार अजूनही हक्काच्या घरापासून वंचित आहेत. गिरणी कामगारांच्या घरांसाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी गिरणी कामगार ऑगस्ट क्रांती मैदानावर धडकणार असल्याचे समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितले.