अन्नात मिसळायची लघवी! अख्खं कुटुंब पडलं आजारी; असं उघड झालं मोलकरणीचं घाणेरडं कृत्य

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक किळसवाणी घटना समोर आली आहे. येथे एक महिला गेल्या 8 वर्षांपासून एका घरात मोलकरणीचं (मेड) काम करत होती. यावेळी ती घरातील लादी, कचऱ्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत सगळी कामे करायची. मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे ती जेवणात लघवी मिसळायची. त्यामुळे हे अन्न खाऊन त्या कुटुंबातील प्रत्येक जण आजारी पडू लागला होता. यावेळी कुटुंबातील एका व्यक्तीने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर मोलकरणीचे घाणेरडे कृत्य उघड झाले.

दरम्यान, गाझियाबादच्या थाना क्रॉसिंग रिपब्लिक भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबासोबत हा प्रकार घडला. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून पोटाच्या आणि यकृताच्या आजाराने त्रस्त होती. सुरुवातीला कुटुंबीयांना वाटले की हा एक सामान्य संसर्ग आजार आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेतले. मात्र इतके करूनही प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरात आणि इतर भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. जेणेकरून जेवण तयार करण्यावर लक्ष ठेवता येईल. यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरी काम करणारी मोलकरीण रिना स्वयंपाक करताना जेवणात लघवी मिसळताना दिसली. हे मोलकरणीचे हे घाणेरडे कृत्य पाहून संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला.

मोलकरीण रिना विरुद्ध पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित कुटुंबाच्या घरातील मोलकरीण ही गेल्या आठ वर्षांपासून आमच्या घरात काम करत आहे. काही महिन्यांपासून कुटुंबातील सदस्यांना यकृताचा आजार होऊ लागला होता. सुरुवातीला हा संसर्ग आहे असे समजून मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण आराम मिळाला नाही. यानंतर आम्ही या गोष्टीचा शोध घेतला असता सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर ती आमच्या जेवणात लघवी मिसळताना दिसली. असे घाणेरडे कृत्य मोलकरीण बऱ्याच दिवसांपासून करत होती, असे पीडित कुटुंबाच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे क्रॉसिंग रिपब्लिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. तसेच आरोपी मोलकरीण रिना हिला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास व पुढील कारवाई करण्यात येत आहे.