घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेची याचिका हायकोर्टाने फेटाळली, पोलिसांनी केलेली अटक कायदेशीरच

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेने तातडीच्या सुटकेसाठी केलेली याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. होर्डिंग दुर्घटना ‘देवाची करणी’ असल्याचा दावा करीत भिंडेने अटकेच्या कारवाईवर आक्षेप घेतला होता. तथापि, पोलिसांनी केलेली अटक कायदेशीरच आहे, असे मत नोंदवत न्यायालयाने भिंडेला दिलासा नाकारला.

भिंडेच्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दोन दिवसांपूर्वी निकाल राखून ठेवला होता. हा निकाल शुक्रवारी जाहीर केला. पोलिसांनी अटकेची कारवाई करताना आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले. भिंडेला अटक करण्याच्या कारवाईत कुठलीही कमतरता आढळली नाही. त्यामुळे अटक व कोठडी बेकायदा असल्याचा दावा करीत भिंडेने सुटकेसाठी केलेली विनंती तथ्यहीन आहे, असे मत खंडपीठाने नोंदवले.