घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या स्ट्रक्चरल इंजिनीयरला शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयाने 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे सत्र न्यायालयाने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड पंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे तिच्या अटकेची शक्यता वाढली आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गुरुवारी स्ट्रक्चरल इंजिनीयर मनोज संघू याला अटक केली होती. शुक्रवारी त्याला दंडाधिकारी न्यायालयापुढे हजर केले होते. 13 मे रोजी कोसळलेले हार्ंडग उभारण्यासाठी मनोज संघूने स्थिरता प्रमाणपत्र दिले होते, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आणि कोठडीची मागणी केली. तसेच जान्हवी मराठेचा हार्ंडग उभारण्यामागे सक्रिय सहभाग होता, असे सरकारी वकिलांनी सांगितले. त्याची दखल घेत सत्र न्यायाधीश राजेश ससाणे यांनी जान्हवीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.