…तर पूरग्रस्तच गाळ काढण्यासाठी नदीत उतरतील! घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीचा गडहिंग्लज प्रांतवर मोर्चा

घटप्रभा खोऱ्यातील हिरण्यकेशी, ताम्रपर्णी नद्यांना सातत्याने येणाऱ्या पुराचा शास्त्र्ााrय अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 13) घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावर तातडीने हालचाली न झाल्यास 31 मार्चला पूरग्रस्तच गाळ काढण्यासाठी नदीत उतरतील, असा इशारा देत प्रशासनाला ‘अल्टिमेटम’ देण्यात आला.

घटप्रभा खोऱ्यातील नद्यांना वारंवार येणाऱ्या पुराबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, वर्षानुवर्षे नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे नद्यांची पात्रे उथळ झाली असून, त्यामुळे थोडय़ाशा पावसानेदेखील नदीचे पाणी पात्राबाहेर येते. त्यामुळे हा गाळ काढण्याची मोहीम शासनाने तातडीने हाती घ्यावी, 2019च्या पुराने महत्तम पूररेषा दाखवून दिली आहे. त्यानुसार तातडीने पूररेषा निश्चित करण्यात यावी, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी नदीकाठावर पुराच्या धोकापातळीत असलेल्या वस्त्या, गावे यांच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तातडीने हाती घ्यावा, पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या पिकांचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसानभरपाई देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या संदर्भात प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देण्यात आले.

अमर चव्हाण म्हणाले, पुराची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनदरबारी लढा द्यायचा आहे. 2019, 2021 व 2024 यावर्षी आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे केले; मात्र तुटपुंजी मदत दिली. नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचल्याने दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. शासनाने 31 मार्चच्या आत कार्यवाही न केल्यास गाळ काढण्यासाठी प्रत्यक्ष जनताच नदीत उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, पाऊस कमी होऊनदेखील नद्यांना पूर येतो. यामागे नदीत साचलेल्या गाळाचा भराव हे एक प्रमुख कारण आहे. पाऊस व पूर आल्यानंतरच यावर चर्चा होते. पूर निघून गेल्यानंतर पूरग्रस्तांचे प्रश्न बाजूला पडतात, त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची आता गरज आहे.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, संपत देसाई, ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गडय़ानावर, दिलीप माने, संतोष चिकोडे, संभाजी भोकरे, वसंत नाईक, अमृतराव शिंत्रे, रामराजे कुपेकर, नागेश चौगुले, गोपाळराव पाटील, प्रा. किसनराव कुराडे, विद्याधर गुरबे, रमजान अत्तार उपस्थित होते.