महागाईची ऑक्टोबर हीट, गॅस दोन महिन्यांत तिसऱ्यांदा महागला

ऑक्टोबर हीटच्या चटक्यांसोबतच या महिन्यात महागाईचेही चटके बसणार आहेत. कारण, सणासुदीला सुरुवात होण्यापूर्वीच महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल 48.50 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत वाढवून सरकारने ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर झटका दिला आहे. दरवाढीनंतर व्यावसायिक सिलिंडरसाठी 1,692.50 रुपये मोजावे लागतील. दरम्यान, मुंबईत सप्टेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,605 रुपयांवरून 1,644 रुपयांपर्यंत वाढला होता.

दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1,740 रुपये झाली, परंतु तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती आजपासून लागू झाल्या. गेल्या जुलै 2024 पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे 1 जुलै 2024 रोजी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी दर कपातीची भेट दिली होती, परंतु त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये व्यावसायिक सिलिंडर 8.50 रुपयांनी महागला. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या दिवशीही ग्राहकांना धक्का बसला.

n शहरात नोकरी-धंद्यामुळे महिलांना दिवाळीचा घरगुती फराळ करता येत नाही. अशावेळी मोठय़ा संख्येने महिला दिवाळीचा तयार फराळ खरेदी करतात. व्यावसायिक गॅस सिलिंडर महागल्याने आता तयार फराळही महागणार आहे.

खाद्यपदार्थांच्या दरावर परिणाम

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि महामार्गांवरील ढाब्यांवरील खाणे महागणार आहे. तेल विपणन कंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या. सप्टेंबर आणि ऑगस्टमध्येही अनुक्रमे 39 आणि 8 ते 9 रुपयांची वाढ झाली होती.