‘निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी… चुकले काहीतरी क्षमा असावी…’ अशी प्रार्थना विघ्नहर्त्याच्या चरणी करून जड अंतःकरणाने पुण्यात गणरायाला वाजतगाजत निरोप देण्यात आला. घरगुती, मानाची प्रमुख गणपती मंडळे आणि सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणपतींचे विधिवत विसर्जन झाले. तब्बल 28 तास 45 मिनिटे इतक्या वेळेनंतर विसर्जन मिरवणुकीने सार्वजनिक गणेशोत्सवाची दिमाखात सांगता झाली.
पुण्याची वैभवशाली गणपती मिरवणूक पाहण्यासाठी आणि ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी मंडई, लक्ष्मी रस्ता, टिळक चौक गर्दीने फुलून गेले होते. सकाळी 10 वाजता मानाचा पहिला कसबा गणपतीचे मंडई येथे आगमन झाले. गणेशभक्तांच्या उपस्थितीत ‘श्रीं’ना पुष्पहार अर्पण करून आरती झाली आणि वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीपाठोपाठ दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक वाजतगाजत निघाली. पारंपरिक चांदीच्या पालखीतून निघालेली बाप्पाची मूर्ती विलोभनीय दिसत होती. समाधान चौकात ‘शिवमुद्रा’च्या पथकाने केलेले ढोल-ताशावादन आणि शंखनादाने वातावरणात चैतन्य निर्माण केले.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे फुलांनी सजविलेल्या ‘सूर्यरथा’तून आगमन होताच भक्तांनी टाळ्या वाजवीत अभिवादन केले. पॉवरलिफ्टिंग खेळात अनेक पदके मिळवून देणाऱया पुरुष व महिला खेळाडू मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची देखणी मूर्ती ‘जगन्नाथ पुरी रथा’तून मिरवणुकीत सहभागी झाली. आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथासाठी हायड्रॉलिकचा वापर करण्यात आला. ‘स्व-रूपवर्धिनी’ची मल्लखांबची प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली.
मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीतून मिरवणुकीत आगमन झाले. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, आवर्तन ढोल-ताशा पथकांचे वादन उत्तम झाले. इतिहासतज्ञ मोहन शेटे हे लोकमान्यांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले. ‘माऊली रथ’ मिरवणुकीचे आकर्षण ठरला.
मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक सकाळी वेळेत सुरू झाली; पण ती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होत असताना मध्ये-मध्ये खूपच अंतर पडत राहिले. केसरी वाडा गणपतीला टिळक चौकात यायला सायंकाळचे 7 वाजले. रस्त्याच्या दुतर्फा भविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
प्रमुख मानाच्या गणपतींमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक गणपती उत्सव मंडपातून दुपारी 4 वाजता निघाली. ‘श्री उमांगमलज रथा’मध्ये दगडूशेठ गणपतीची मूर्ती खूप सुंदर दिसत होती. मिरवणुकीत ‘रुग्णसेवा रथ’ अग्रभागी होता. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांअंतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरून करण्यात आली.
अखिल मंडई मंडळाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी 7 वाजता ‘आदिशक्ती रथा’तून निघाली. रौद्ररूपातील कालिमातेची 15 फूट उंचीची मूर्ती आणि पुढे प्रथमच शारदा-गजाननाची 60 अंशांत फिरणारी मूर्ती असा देखावा साकारल्याने सर्व बाजूंनी भाविकांना दर्शन घेता आले.
भवानी पेठमधील महाराष्ट्र मित्रमंडळ यांचा शेवटचा गणपती येथून मार्गस्थ झाला. अलका चौकात गणेशोत्सव मिरवणुकीची सांगता झाली. 189 गणेश मंडळे अलका चौकातून गेली आहेत. यंदाची मिरवणूक 28 तास 45 मिनिटे सुरू होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील विसर्जन मिरवणूक दुपारी तीन वाजता संपल्याचे जाहीर केले.