Jalna crime news – 22 लाखांच्या गांजासह 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिसांनी गोषेगाव ते हसनाबाद रोडवर अवैधरित्या कारमध्ये विक्रीसाठी गांजा घेऊन जात असताना आरोपीच्या ताब्यातून 22 लाख रुपयांच्या गांजासह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज 19 ऑक्टोंबर रोजी हसनाबाद पोलिसांनी केली.

जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने हसनाबाद पोलीस ठाण्याचे नेमणुकीस असलेले दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना देत मार्गदर्शन केले. त्याअनुषंगाने आज १९ रोजी माहिती मिळाली की, मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गांजाची अवैधपणे विक्री करण्याच्या उद्देशाने सिल्लोडवरुन कायगांव मार्गे हसनाबादकडे एक कारमध्ये गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

सहायक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती देऊन गोषेगाव ते हसनाबाद रोडने नायब तहसीलदार, पंच, आवश्यक साहित्यासह सापळा रचला. पांढऱ्या रंगाची कार दिसून आली. कारला (एमएच १२-केएन-७५९८) थांबवून कारचालकास त्याचे नाव विचारले असता त्याने नारायण कृष्णा इंगळे रा. सिरसगाव वाघूळ ता. भोकरदन असे सांगितले. त्यानंतर पंच व नायब तहसीलदार पप्पुलवाड यांच्यासमक्ष झडती घेतली असता त्यात ८७ किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. अमली पदार्थची किंमत 21 लाख 85 हजार रुपये व कारची किंमत ४ लाख ५० हजार असा एकूण 26 लाख 35 हजार रुपयाचा माल मिळून आला.

गांजा नारायण कृष्णा इंगळे हा अवैध रित्या घेऊन जात असताना आढळून आला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक फकीरचंद फडे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय आहिरे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय आहिरे, पोलीस उपनिरीक्षक फकरीचंद फडे, पोहेकॉ. सागर देवकर, पोहेकॉ. भरतकुमार चौधरी, मपोहेकॉ. कल्पना बोडखे, पोकॉ. निलेश खराट, पोकॉ. प्रकाश बोर्डे, पोकॉ. दीपक सोनुने, पोकॉ योगेश पाटीलपाईक, पोकॉ. नितेश खरात, पोकॉ. सुरेश डुकरे यांनी केली.