आर्थिक आणि जमिनीच्या वादातून कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा शुक्रवारी भरदिवसा दुपारी दीड वाजता पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या झाडून खून केला गेला. दुचाकीवर आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी मोहोळला सुतारदरा परिसरात गाठून पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. गंभीररीत्या जखमी झालेल्या शरद मोहोळचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेमुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली असून, पुण्यात टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शरद हिरामण मोहोळ (40, रा. सुतारदरा, कोथरूड) असे खून झालेल्या गँगस्टरचे नाव आहे. साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर याच्यासह साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे. गँगस्टर शरद मोहोळ याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, सरकारी कामात अडथळा अशा गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत. संबंधित काही गुह्यांत मागील काही महिन्यांपासून तो जामिनावर बाहेर होता. शुक्रवारी दुपारी सवाच्या सुमारास मोहोळ घराखाली उभा असताना आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना याच्यासह दुचाकीवर आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. हल्ल्यात तीन गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. सह्याद्री रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
टोळक्याकडून आठवडय़ापासून पाठलाग
साहिल ऊर्फ मुन्ना याच्यासह 10 ते 12 जणांचे टोळके मागील आठवडय़ापासून रेकी करीत होते.
– त्याचे विविध गुन्हेगारी टोळ्यांसोबत वाद होते. आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना याच्यासोबत शरदचा आर्थिक व जमिनीचा वाद होता. त्याच वादातून मोहोळचा गोळ्या झाडून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुख्य आरोपीसह 8 जणांना पकडले
गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खेड शिवापूर परिसरातून मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह आठ जणांना रात्री ताब्यात घेतले.
राजकीय पुनर्वसनाची होती चर्चा
जामिनावर बाहेर आल्यानंतर शरद मोहोळ याने मोठमोठय़ा सार्वजनिक कार्यक्रमांत हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. विविध सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमांत सहभागी होऊन त्याने स्थिर होण्यास प्राधान्य दिले होते. विशेषतŠ धार्मिक कार्यक्रमात त्याचा सहभाग वाढल्यामुळे अनेकांसोबत त्याचे संबंध सुधारले होते. त्याच माध्यमातून तो राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. आगामी विविध निवडणुकांमध्ये शरद मोहोळ विविध राजकीय गटांना फायदेशीर ठरणार होता. व्होटबँकही मोठी असल्यामुळे त्याच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली होती.