बाप्पाच्या आगमन मार्गातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करा! गणेशोत्सव समितीची मागणी

गणेशोत्सव दीड महिन्यावर आला असून येत्या 11 ऑगस्टपासून लालबाग-परळ येथील कारखान्यातून बाप्पाच्या स्वारींचे मंडपांकडे आगेकूच सुरू होणार आहे. त्याआधी लालबाग-परळ येथील मार्गांची डागडुजी, दुरुस्ती आणि खड्डे भरण्याचे काम करावे, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेकडे केली आहे. याबाबत गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी पालिकेला निवेदन दिले आहे.

मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून 11 ऑगस्टपासून लालबाग-परळ येथील गणेशमूर्ती कारखान्यातून बाप्पाच्या आगमनास सुरुवात होणार आहे. मात्र पालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवताना असमतोल रस्ते झाले आहेत. असमतोल रस्त्यामुळे बाप्पाच्या आगमनात अडथळे निर्माण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात भक्तांची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेशमूर्तींच्या आगमनास 11 ऑगस्टपासून सुरुवात होते. मात्र मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवताना रस्ते असमतोल झाले असून बाप्पाच्या आगमनात अडथळे निर्माण करणारे आहेत. तसेच या ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा झाडांच्या फांद्यांची छाटणी योग्य प्रकारे झालेली नाही. केबल लटकत असल्यास त्या 11 ऑगस्टपूर्वी काढव्यात, अशी सूचना पालिका प्रशासनाला केल्याचे ते म्हणाले.

पालिकेकडून कार्यवाही सुरू

या विषयासंदर्भात पालिकेच्या बैठकीत मुंबईतील रस्त्यावरील पडलेले खड्डे तसेच रस्त्याचे काम करताना रस्त्यांचा असमतोलपणा ही बाब संबंधित उपस्थित असलेल्या पालिका अधिकाऱयांच्या निदर्शनास आणलेली आहे. आगमनापूर्वी तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.