गडकरी धमकी प्रकरण, लश्करचा हस्तक अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील धमकी प्रकरणात पीएफआयनंतर आता लश्कर-ए-तोयबाची एण्ट्री झाली आहे. कर्नाटकात लश्कर-ए-तोयबासाठी काम करणारा बशिरूद्दीन नूर अहमद ऊर्फ अफसर पाशा हा धमकी प्रकरणामागचा खरा सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार नागपूर पोलिसांनी आज अफसर पाशाला बेळगाव येथे अटक करून नागपूरला आणले.

कोटय़वधी रुपयांच्या खंडणीसाठी नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात 4 जानेवारी आणि 21 मार्चला धमकीचे फोन आले होते. बेळगाव तुरुंगातून धमकीचे फोन आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार नागपूर पोलिसांनी 28 मार्च रोजी जयेश पुजारी ऊर्फ शाकीरला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेत नागपुरात आणले होते. त्याची सखोल चौकशी केली असता धमकीच्या कॉलमागे दुसरेच कोणी असल्याचे निदर्शनास आले. त्यातच 21 मार्च रोजी आलेल्या धमकीच्या कॉलदरम्यान संबंधिताने खंडणी देण्यासाठी कर्नाटकातील एका तरुणीचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात रिजवाना नावाच्या तरुणीचा नंबर असल्याचे समोर आले असता तिचीही चौकशी केली. त्यामध्ये बशीरुद्दीन नूर अहमद ऊर्फ अफसर पाशा हा धमकी मागचा खरा सूत्रधार असल्याचे समोर आले होते. बशिरुद्दीन नूर अहमद याचे गुन्हेगारी विश्वातील नाव हे अफसर पाशा असे आहे. तो कर्नाटकातील चिक्कबल्लापुराचा रहिवासी आहे.