शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 500 जणांना गंडवले, मुंबई गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून उचलून आणला

मी सेबीचा रजिस्टर्ड एजंट आहे, तुम्ही माझ्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा. तुम्हाला वर्षाला 84 टक्के परतावा देतो, असे प्रलोभन दाखवून सुमारे 400 ते 500 नागरिकांना कोटय़वधी रुपयांचा चुना लावून पसार झालेला भामटा अखेर गजाआड झाला. मुंबई गुन्हे शाखेने त्याला मध्य प्रदेशच्या छतरपूर गावातून उचलून आणला. त्याच्याकडून एक हजार 900 ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि 25 लाख रोकड असा कोटय़वधी रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

वर्सोवा परिसरातील अनेक लोकांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक झाली होती. त्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर्टी सेलचे प्रभारी निरीक्षक मंगेश देसाई, निरीक्षक प्रवीण मोहिते, निरीक्षक अरुण थोरात, उपनिरीक्षक प्रकाश गवळी आदींचे पथक समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान आशीष दिनेशकुमार शहा (44) या भामटय़ाने अनेक नागरिकांची फसवणूक जास्त झाल्याचे निष्पन्न झाले. गेल्या दोन महिन्यांपासून आशीष शहा लपून राहत होता. तांत्रिक बाबी व मानवी कौशल्याच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता शहा हा मध्य प्रदेशातील छत्तरपूर परिसरात लपून राहत असल्याचे समजले. त्यानुसार एक पथक तेथे गेले, अखेर तो हाती लागला.

सेबी रजिस्टर्ड कंपनी एजंट असल्याची बतावणी

पदवीधर असलेल्या आशीष शहा याने कोविड काळात समाजसेवा करत होता. त्याचवेळी त्याने आपल्या परिचयातील लोकांना स्वतःची समरयश ट्रेडिंग कंपनी ही सेबी रजिस्टर्ड असून तो सेबीचा एजंट असल्याचे सांगू लागला. त्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने एकाकडून पैसे घेऊन ते दुसऱयाला देत गुंतवणूकदारांची साखळी वाढवली. नंतर मग मोठय़ा प्रमाणात पैसा जमा झाल्यावर त्याचा कारभार लोकांना संशयास्पद वाटू लागला.

लोकांच्या पैशांतून मालमत्ता जमवली

आशीष कुमार शहा याने नागरिक शोधत असून ते आपल्याला मारण्याच्या तयारीत असल्याचे कळताच मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. जमलेला पैसा कसा न्यायच्या, असा प्रश्न उभा ठाकल्यावर त्याने तब्बल 1,900 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे बनवून घेतली आणि उर्वरित रक्कम घेऊन मध्य प्रदेश गाठले होते. पोलिसांना त्याची सहा बँक खाती सापडली असून त्याने चार गाडय़ा, दोन फ्लॅट, गावी दोन ठिकाणी जागा घेऊन ठेवल्याचे समोर आले आहे.