दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला, चार कामगार ढिगाऱ्याखाली दबले; एकाचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेस वेवर राजस्थानमधील कोटा येथे निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ढिगाऱ्याखाली चार कामगार दबले. यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला तर तीन जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कोटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोटा येथील रामगंज मंडईतील मोडक परिसरात बांधण्यात येत असलेल्या बोगद्यात हा अपघात झाला. अपघातावेळी कामगार बोगद्यात काम करत होते. बोगद्याचा काही भाग कोसळताच अन्य कामगारांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या सहकाऱ्यांना तात्काळ बाहेर काढले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मोडक सार्वजनिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून कोटा येथे रेफर करण्यात आले.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुकुंदरा व्याघ्र प्रकल्प (दरा) जवळील टेकड्यांखाली 4.9 किमी लांबीचा 8 पदरी बोगद्याचे बांधकाम सुरू आहे. ऑस्ट्रेलियन अभियंत्यांच्या देखरेखीखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हा बोगदा बांधला जात आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी अंदाजे 1200 कोटी रुपये खर्च येणार असून 2025 पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.