माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी चार आरोपींना पकडले. अमित हिसमसिंग कुमार (29) याला हरयाणात पकडण्यात आले. तर उर्वरित तिघांना पुण्यातून अटक केली. या तिघांचाही गुह्यात सहभाग निश्चित झाला आहे. तसेच या गुह्यातील पाहिजे आरोपी आणि हत्येचा कट रचण्यात महत्वाची भुमिका बजावणारा झिशान अख्तर याला हरयाणातील कैथलमध्ये आसरा, पैसा व अन्य सुविधा पुरविण्याचे काम अमितने केले होते.
बाबा सिद्दिकी यांची कॉन्ट्रक्ट किलिंग असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. हे कॉन्ट्रक्ट झिशानकरवी देण्यात आले होते. जूनमध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर झिशानने त्याची राहण्याची जागा बदलली. त्याला सिद्दिकी यांच्या हत्येचे कॉन्ट्रक्ट मिळाल्यानंतर मूळचा जालंधरचा असलेला झिशान हरयाणातील कैथलमध्ये वास्तव्यास आला. तेथे एका सामायिक मित्राच्या माध्यमातून झिशान आणि अमित संपर्कात आले. बाबा सिद्दिकी यांची हत्या करायची असे दोघांमध्ये बोलणे झाल्यानंतर अमितने हरियाणातल्या कैथलमध्ये झिशानची राहण्याची व्यवस्था केली.
इतकेच नाही तर झिशानने अमितच्या बँक खात्यावर पैसे मागवून घेतले होते. त्यानुसार अमितने त्याच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर आठ वेळेस पैसे काढून ते झिशानला दिले होते. त्यातीलच काही रक्कम वेगवेगळ्या मार्गाने झिशानने पुण्यात प्रवीण लोणकरपर्यंत देखील पोहचविल्याचे चौकशीत समोर येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सर्व कल्पना अमितला होती. हत्येच्या कटात अमितदेखील सहभागी झाला होता. त्यामुळे अमितच्या माध्यमातून बऱ्याच बाबींचा उलगडा होईल.
हत्येचे कॉन्ट्रक्ट कोणी दिले
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट झिशान अख्तरकरवी शिजला. झिशानने वेगवेगळ्या माध्यमातून हत्येचा कट पूर्णत्वास नेला. मात्र झिशान एकदाही मुंबईत आला नाही. कैथलमध्ये बसूनच त्याने सर्व बाबी घडवून आणल्या. हत्येच्या आठ दिवसांपूर्वीच झिशानने कैथलमधून काढता पाय घेत पळ काढला. त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे कॉन्ट्रक्ट कोणी दिले ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
12 वीपर्यंत शिक्षण, दारूचा अड्डा
हरयाणातल्या कैथलमध्ये राहणाऱ्या अमितवर चार ते पाच गुह्यांची नोंद आहे. अमित तेथील कारागृहात होता. 12 वीपर्यंत शिकलेला अमित तेथे दारूचा अड्डा चालवायचा. एका सामायिक मित्राच्या माध्यमातून अमित गंभीर गुह्यांची नोंद असलेल्या झिशानच्या संपर्कात आला. मग त्याने झिशानला कैथलमध्ये आसरा देत त्याला सर्व सुविधा पुरविल्या होत्या.
पुण्यातून आणखी तिघांना अटक
बाबा सिद्दिकी हत्याकांड प्रकरणात गुन्हे शाखेने आज आणखी तिघांना अटक केली. ही कारवाई पुण्यात करण्यात आली. रूपेश मोहोळ (22), करण साळवे (19) आणि शिवम कोहाड (20) अशी त्या तिघांची नावे आहेत. रूपेश पुण्यातल्या शिवणे तर उर्वरित दोघे उत्तम नगरातील राहणारे आहेत. या तिघांच्या अटकेमुळे बाबा सिद्दिकी हत्याकांड प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 14 झाली आहे. हे तिघे प्रवीण लोणकर तसेच अन्य आरोपींच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.