Nagar Crime News – बंदुकीचा धाक दाखवून ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण, चौघांना अटक

आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामपंचायत सदस्यास बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करणार्‍या चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. किशोर सोमनाथ सांगळे (वय 27, रा. सिध्दटेक, ता. कर्जत), सागर चिमाजी देमुंडे (वय 27, रा. आळसुंदे, ता. कर्जत), प्रतिक ऊर्फ सनी राजेंद्र पवार (वय 25, रा. सोनारगल्ली, ता. कर्जत), महेंद्र ऊर्फ गोट्या अरुण गोंडसे (वय 26, रा. जोगेश्‍वरवाडी, ता. कर्जत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार अमोल भोसले (रा. सिध्दटेक, ता. कर्जत), माऊली ऊर्फ ज्ञानेश्‍वर उबाळे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) हे पसार झाले आहेत.

दीपक दादाराम राऊत हे माहिजळगाव येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबले होते. यावेळी शिवप्रसाद ऊर्फ बंटी उबाळे आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्यांच्या गाडीसमोर दोन गाड्या उभ्या केल्या. एका गाडीमधील इसमांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून आढळगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाचा अविश्‍वास ठराव मंजूर होऊ नये, या उद्देशाने राऊत यांच्या गाडीतील ग्रामपंचायत सदस्य नितीन बन्सी गव्हाणे यांना शिवीगाळ, मारहाण केली. तसेच गाडीत बसवून अपहरण करुन घेऊन गेले.

याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार बबन मखरे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या पथकाने सिध्दटेक येथे ही कारवाई केली.