मिंधे सरकारने चोरला स्वच्छता मॉनिटर प्रकल्प, प्रकल्प संचालकाचे महिनाभरापासून उपोषण; कुटुंबीयांना प्रचंड मनःस्ताप

प्रोजेक्ट्स लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अभियान पुण्यातील रोहित आर्या हे 2022पासून स्वखर्चावर राबवत होते. ही संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आवडली. त्यानंतर 2023 मध्ये शासनाने थोडे अर्थसहाय्य दिले. अभियान मोठे होत गेले. या अभियानासाठी 2 कोटी रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रोजेक्ट्स लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटरचा मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’मध्ये समावेश करण्यात आला. सर्व अधिकार वापरले गेले. मात्र, यात ज्यांची मूळ संकल्पना होती त्या रोहित आर्या यांना डावलण्यात आले. त्यामुळे व्यथित होऊन रोहित आर्या महिनाभरापासून उपोषणाला बसले आहेत. इतका संघर्ष करून न्याय मिळत नसेल तर त्याला मरू द्या, असा टाहो त्यांची पत्नी अंजली आर्या यांनी फोडला आहे.

काय आहे स्वच्छता मॉनिटर अभियान

‘मिशन स्वच्छ भारत’ या याजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येते. 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना केंद्रित करून हा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबद्दल निष्काळजीपणा करणाऱयाला याबाबत निदर्शनास आणून द्यायचे तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होण्याबद्दल प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.

जिवाचे बरेवाईट झाले तर मुख्यमंत्री जबाबदार

जोपर्यंत फिल्म लेट्स चेंज अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर अभियान ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे. 2 वर्षे राज्यस्तरावर राबवल्या जात असलेल्या अभियानाचा प्रकल्प संचालक असताना त्यांनी सध्या राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पातून मला डावलले. मी कुठेच नाही. हा माझ्यावर अन्याय असून माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे जबाबदार असतील असा इशारा रोहित आर्या यांनी दिला आहे.

प्रकल्पात मीच चुका केल्याचा खोटा आरोप

या प्रकल्पात मीच अनेक चुका केल्या असून त्याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगून याबद्दल गुन्हा दाखल करण्याची धमकी शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव तुषार महाजन देत आहेत. तसेच मलाच खोटय़ा प्रकरणात अडकवण्याचा सरकारचा डाव  असल्याचा आरोप रोहित आर्या यांनी केला आहे.

शालेय शिक्षण विभागाचे तोंडावर बोट

याप्रकरणी शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव तुषार महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात काहीच बोलायचे नसल्याचे उत्तर दिले. याप्रकरणी काही चौकशी सुरू आहे का, असा सवाल विचारला असता आम्ही याबद्दल काहीच बोलू शकत नाही, असे सांगत तोंडावर बोट ठेवले.