बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन

भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार, बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक ज्ञानेश्वर (तात्या) रावसाहेब पाटील यांचे निधन झाले आहे. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांचे निधन शिवसैनिक सुन्न झाले आहेत.

परंडा विधानसभा मतदारसंघात त्यांना सरकार तसेच तात्या नावाने ओळखले जात होते. शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर धोत्रा येथील शेतात दुपारी साडे अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांचा जीप चालक ते आमदार हा प्रवास वाखाणण्याजोगा होता. शिवसेनेमध्ये विविध पदांवर काम करत असताना 1995 आणि 1999 असे सलग दोन वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

आमदार होण्याआधी बिनविरोध नगरसेवक होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. मिंध्यांनी गद्दारी केल्यानंतरही ज्ञानेश्वर पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यांच्या अकाली निधनामुळे परंडा मतदारसंघात शोककळा पसरली आहे.