महर्षी वाल्मिकी महामंडळ कथित घोटाळा प्रकरण; कर्नाटकच्या माजी मंत्र्यांना ईडीकडून अटक

कर्नाटकातील महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री बी नागेंद्र यांना ईडीने अटक केली आहे. दीर्घकाळ चौकशी केल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा ईडीने नागेंद्र यांना अटक केली. नागेंद्र यांच्यावर 88 कोटी रुपयांच्या निधीचा कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

बी नागेंद्र यांनी आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री असताना स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बुधवार आणि गुरुवारी नागेंद्र संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. त्यानंतर नागेंद्र यांना चौकशीसाठी बंगळुरुतील शांतीनगर येथील कार्यालयात नेण्यात आले. दीर्घकाळ चौकशीनंतर नागेंद्र यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

महामंडळाचे लेखा अधिक्षक चंद्रशेखर पी यांनी आत्महत्येनंतर सदर घोटाळा प्रकाशझोतात आला. चंद्रशेखर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक हेराफेरीचा आरोप केला होता. ही बाब उघडकीस येताच नागेंद्र यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर बी नागेंद्र आणि काँग्रेसचे आमदार बी डड्डल हे ईडीच्या रडारवर आले. नागेंद्र यांच्या अटकेनंतर डड्डल यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.

नागेंद्र यांच्यासह डड्डल यांच्याही निवासस्थानांवर ईडीने छापेमारी केली. एसआयटी, सीबीआय आणि ईडी या तीन तपास संस्थांकडून या घोटाळ्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच कथित घोटाळ्यातील 14.5 कोटींची रोकडही जप्त करण्यात आली आहे.