हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांनी मंगळवारी बडोदा येथील राहत्या घरी वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला. हिंदुस्थानी संघाचे माजी सलामीवीर आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते.
दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 मध्ये इंग्लंड दौऱयात कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर देशासाठी 10 कसोटी सामने खेळले. ते शेवटची कसोटी 1961 साली चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध खेळले होते.
1959 साली इंग्लंड दौऱयावर दत्ताजीराव यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. त्या इंग्लंड दौऱयात त्यांनी 1100 हून अधिक धावा केल्या होत्या, पण कसोटी मालिकेत इंग्लंडने हिंदुस्थानचा 5-0 असा पराभव केला.
या दौऱयानंतर त्यांनी दीर्घकाळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आणि 1957-58 हंगामात त्यांनी बडोद्याला दशकात प्रथमच रणजी करंडक जिंकून दिले. गायकवाड यांनी फायनलमध्ये सर्व्हिसेसविरुद्ध डावात विजय मिळवत शतक (132) केले. त्याने 110 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 17 शतकांच्या मदतीने 5788 धावा केल्या. नाबाद 249 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.
2016 साली बनले सर्वात वयस्कर हिंदुस्थानी कसोटीपटू
2016 सालापर्यंत दीपक शोधन हे हिंदुस्थानचे सर्वात वयस्कर कसोटीपटू होते. वयाच्या 87 व्या वर्षी शोधन यांचे अहमदाबाद येथे देहावसान झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत दत्ताजीराव गायकवाड हिंदुस्थानचे सर्वात वयस्कर कसोटीपटू होते. ते 95 वर्षे 109 दिवसांचे होते. आता त्यांच्यापेक्षा वयस्कर असलेले रोनाल्ड ड्रपर (97 वर्षे 51 दिवस) आणि नील हार्वे (95 वर्षे 128 दिवस) हे कसोटीपटू हयात आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकन नॉर्मन गॉर्डन यांनीच आपल्या वयाचे शतक गाठले होते. ते 103 वर्षे 27 दिवस जगले.