वर्ल्ड कपचे आयोजनच हिंदुस्थानसाठीच, माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनचा आरोप

वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत सुरू असलेला यंदाचा टी-20 वर्ल्ड कप फक्त हिंदुस्थानसाठीच आयोजित केला असल्याचा गंभीर आरोप माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनने केला आहे. ही व्यावसायिक फायद्यांसाठी आयोजित केलेली द्विपक्षीय स्पर्धा नाही. त्यामुळे आयसीसीने इतर खेळत असलेल्या देशांसाठी थोडे अधिक निष्पक्ष व्हायला हवे होते, असाही सल्ला त्याने आयसीसीला दिला.

बीसीसीआय आणि हिंदुस्थानी क्रिकेट नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ताकद आणि आपली आर्थिक श्रीमंती दाखवत असते. ही टी-20 वर्ल्ड कपसुद्धा एक स्पर्धा आहे, हे सर्वांना माहित्येय. ते म्हणजेच हिंदुस्थानी संघ केव्हाही खेळू शकतो. त्यांचा उपांत्य सामना कुठे रंगणार याची त्यांना सर्वांच्या आधीच कल्पना आहे. ते प्रत्येक सामना सकाळी खेळत आहेत. जेणेकरून हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमी त्यांना रात्री टीव्हीवर पाहू शकतील. हिंदुस्थानी चाहत्यांना रात्री सामने पाहता यावेत म्हणून हा सारा प्रताप झाल्याचेही वॉनने सांगितले. हिंदुस्थानच्या आर्थिक सत्तेपुढे आयसीसी झुकत असल्याची टीकाही त्याने केली. वॉन पुढे म्हणाला, मला कल्पना आहे की पैशांशिवाय काहीच होत नाही. पण ही गोष्ट द्विपक्षीय मालिकेत मी समजू शकतो. पण जेव्हा आयसीसी वर्ल्ड कप असतो तेव्हा आयसीसीने सर्व संघांचा विचार करून निष्पक्षपणे आपली भूमिका मांडायला हवी. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत तुम्ही एकाच संघाच्या प्रति सहानुभूती किंवा त्यांच्याच बाजूने विचार करू शकत नाही. जणू ही स्पर्धा पूर्णपणे हिंदुस्थानसाठीच आयोजित केली आहे. हिंदुस्थानी चाहत्यांनुसार कागदावर हिंदुस्थानी संघ सर्वोत्तम आहे आणि त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. ते रात्रीचे सामनेही जिंकू शकतात. गयानात जूनमध्ये 30 पैकी 24 दिवस पाऊस पडत असतो. म्हणजेच त्यांच्याकडे केवळ सहा दिवस कोरडे आहेत आणि बाकी दिवस पावसाचेच आहेत. इतकी मोठी स्पर्धा असूनही एकही राखीव दिवस का ठेवण्यात आला नसल्याचा सवालही वॉनने विचारला.