कर्नाटकात भाजपात बंडखोरी; के. एस. ईश्वरप्पा अपक्ष लढणार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात भाजपातच बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार बी. वाय. राघवेंद्र यांच्याविरोधात शिवमोगातून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा त्यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागले. त्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेत बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

येदियुरप्पा यांच्या पुत्राला पदावरून हटवण्याच्या मागणीवर ईश्वरप्पा अडून बसले आहेत. आता कुठलीच चर्चा होणार नाही. माझी लढाई तर्कावर आधारित असून शिवमोगा येथून लढणार असा निर्धार त्यांनी केला आहे. तसेच जर उमेदवारी मागे घ्यावी अशी भाजपा श्रेष्ठाRची इच्छा असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना पदावरून हटवावे, अशी मागणी लावून धरली आहे. राज्यातील भाजपाची सर्व शक्ती एकाच कुटुंबाकडे आहे. हे कुटुंब हिंदू कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना सातत्याने दुखावत आहे, असा आरोपही ईश्वरप्पा यांनी केला आहे.