हेमंत सोरेन पाच महिन्यांनी सुटले

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज अखेर तब्बल पाच महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर आले. जमीन घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सोरेन यांच्याविरोधात सबळ पुरावे नाहीत, असे स्पष्ट करत झारखंड हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे ईडीला हा जोरदार दणका मानला जात आहे.

हेमंत सोरेन यांचे तुरुंगाबाहेर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या. हेमंत सोरेन पीएमएलए कायद्यांतर्गत जामिनाच्या दोन्ही अटी-शर्ती पूर्ण करतात त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येत आहेत, असेही हायकोर्टाने सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर सोरेन यांच्या निवासस्थानी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हेमंत सोरेन यांना 31 जानेवारीच्या रात्री ईडीने अटक केली होती.

या दोन अटींवर जामीन

आरोपीने कथित गुन्हा केला आहे, असे मानण्याचे कारण नाही.

जामिनावर असताना आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित कोणताही गुन्हा करणार नाही.

13 जून रोजी जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. गेल्या तीन दिवसांपासून न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता.