दहशतवाद आणि व्यापार एकत्र येऊ शकत नाही, पाकिस्तानच्या भूमीवर तब्बल 9 वर्षांनी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री

हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या सीमेवर दहशतवाद, अतिरेकी आणि फुटीरतावाद या तीन दुष्ट प्रवृत्ती घिरटय़ा घालत असून दहशतवाद आणि व्यापार कधीच एकत्र येऊ शकत नाही. दोन देशांमधील परस्पर सहकार्य कधीच वाढू शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सांगितले. इस्लामाबादमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली एसएचओ अर्थात शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हिंदुस्थानने आपली भूमिका ठामपणे मांडली. तब्बल नऊ वर्षांनी हिंदुस्थानच्या केंद्रीय मंत्र्याने पाकिस्तानचा दौरा केला. 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौऱयावर गेल्या होत्या.

चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता परराष्ट्र मंत्र्यांनी व्यापार आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून सर्व देशांनी एकमेकांची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व ओळखण्याची गरज आहे. दहशतवाद, अतिरेकी आणि फुटीरतावाद ही तीन आव्हाने एसएचओसमोर असून ती दूर केल्याशिवाय अनेक उद्दिष्टे साध्य करणे कठीण आहे. संघटनेचे सदस्य असलेल्या देशांनी एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि एकमेकांप्रति प्रामाणिक असणे अत्यंत गरजेचे आहे, असेही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ठामपणे सांगितले. सकाळी 11 वाजता एसएचओची बैठक झाली. यावेळी व्यापार आणि आर्थिक अजेंडय़ावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ प्रकल्पाला नकार

चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट आणि वन रोड’ या प्रकल्पाला हिंदुस्थानने पुन्हा एकदा नकार दिला. रशिया, बेलारूस, इराण, कझाकिस्तान, कीर्गीस्तान, पाकिस्तान, तझाकिस्तान आणि उझबेकिस्थान यांनी चीनच्या या प्रकल्पाला पाठिंबा दिला; परंतु एकमेव हिंदुस्थानने प्रकल्पाला विरोध दर्शवला. हा प्रकल्प म्हणजे चीन-पाकिस्तानसाठी आर्थिक कॉरीडॉर असून तो पाकिस्तानव्याप्त कश्मीरमधून जाणार आहे. हा प्रकल्प आधी बिल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह या नावाने ओळखला गेला. युरेशियन आर्थिक संघाला या प्रकल्पाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकल्पामुळे अनेक देशांवर कर्जाचा बोझा वाढला. हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय असल्याचे एस. जयशंकर म्हणाले. दरम्यान, यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानच्या भूमिकेचा विरोध केला आणि या प्रकल्पाबद्दल संकुचित राजकीय दृष्टिकोन ठेवू नका, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले.

शरीफ आणि जयशंकर यांची 20 सेकंदांची भेट

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि एस. जयशंकर यांच्यात केवळ 20 सेपंदांची भेट झाली. शरीफ यांनी जयशंकर यांचे हस्तांदोलन करत स्वागत केले. या 20 सेकंदांत त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याचा तपशील अद्याप देण्यात आलेला नाही.

चीनने नाक खुपसले; कश्मीर मुद्दय़ावर पाकिस्तानला पाठिंबा

‘एससीओ’ परिषदेला चीनचे पंतप्रधान ली झियांग उपस्थित होते. यावेळी झियांग आणि पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात द्विपक्षीय चर्चा होऊन संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात पाकिस्तानने अप्रत्यक्षपणे जम्मू-कश्मीरातून हाटवलेल्या कलम 370चा उल्लेख केला. चीनने यावेळी नाक खुपसले आणि कश्मीर मुद्दय़ावर पाकडय़ांना पाठिंबा दिला आहे. जम्मू-कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या चॅप्टरनुसार सोडवावा, असे चीनने म्हटले आहे. जम्मू-कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असताना चीनने हा आगाऊपणा केला आहे.

– चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट आणि वन रोड’ या प्रकल्पाला हिंदुस्थानने पुन्हा एकदा नकार दिला.