गेली अनेक वर्षे मुंबईतील डाव्या, पुरोगामी, आंबेडकरी सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या गाण्याने, शाहिरीने सांस्कृतिक प्रबोधन करणारे लोकगायक कॉ. देवचंद रणदिवे यांचे रविवारी शीव रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. रविवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे पत्नी आशालता, एक मुलगा, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे.
कॉ. देवचंद रणदिवे यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीत शाहीर शंतनू कांबळे यांच्यासोबत शाहिरी, गाण्यांच्या माध्यमातून कष्टकऱयांच्या वस्त्यांतून प्रबोधन, जनजागृतीचे कार्य केले.
‘दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती’च्या कार्यातही ते सक्रिय होते. त्यांनी कामगार संघटनांसोबत काम करीत, कामगारांना हक्क मिळवून देण्याचे व त्यांच्यामध्ये जागृती करण्याचेही काम केले. त्यांच्या अंत्यसंस्काराला मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच डाव्या, पुरोगामी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांची अभिवादन सभा 13 डिसेंबर रोजी मुंबईत होणार असल्याचे संजय शिंदे, सुबोध मोरे यांनी कळविले आहे.