कोल्हापुरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर; अजूनही 77 बंधारे पाण्याखाली, 44 जिल्हा मार्ग बंद

तीन दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने जिह्यात उद्भवलेली महापुराची स्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. 43 फूट धोकापातळी असलेल्या पंचगंगेची पाणीपातळी अजूनही एक फूट अधिक होती. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडलेले असून, त्यातून 4356 क्युसेक विसर्ग सुरूच होता. शिवाय 77 बंधारे पाण्याखाली असून, 9 राज्यमार्ग व 44 जिल्हा मार्ग बंद आहेत.

दरम्यान, पुराचे पाणी संथ गतीने उतरत असून, पावसानेही उसंत घेतल्याने शहरातील पूरभागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. ग्रामीण भागात पूर आलेल्या परिसरात अशीच स्थिती आहे. पंचगंगा आणि कृष्णा नद्यांचा संगम असलेल्या शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीसह कुरुंदवाड, राजापूर, तेरवाड या नदीकाठच्या गावांत अजूनही गुडघाभर पाणी आहे. जिह्यात 24 तासांत 15.6 मि.मी. पाऊस झाला.

शाळा, कॉलेज सुरू

अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शुक्रवार व शनिवारी जिह्यातील शाळा व कॉलेजेसना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुट्टी जाहीर केली होती. सध्या जनजीवन पूर्वपदावर आल्याने शाळा-कॉलेजेस आजपासून पूर्ववत सुरू झाली.

स्वच्छतेसाठी धावाधाव

पूर ओसरलेल्या भागात स्वच्छतेला वेग आला आहे. शहरात महापालिका आरोग्य विभागाकडून नदी-नाल्यांतून वाहून आलेला गाळ, झाडाचे ओंडके, प्लॅस्टिक आदी कचरा गोळा केला जात आहे. नागरी वस्तीत पाणी टँकरने स्वच्छता करण्यात येत आहे. औषधफवारणी सुरू आहे. शिवाय पूरग्रस्तही घरांची, दुकानांची स्वच्छता करण्यात व्यस्त होते.