राहुरी – फरार आरोपीची गळफास लावून आत्महत्या

राहुरी तालुक्यातील एक तरुण विविध गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक आल्याची चाहूल लागताच त्या तरुणाने स्वतःच्या घरात घळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी शहरात आज दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली.

गणेश बाळासाहेब शेटे, (वय 26 वर्षे, राहणार पाच नंबर नाका, खळवाडी) या तरुणावर पोलिसात विविध प्रकारचे गुन्हा दाखल आहेत. गणेश शेटे हा तरुण पोलिस डायरीत फरार असताना पोलिसांचे एक पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने आज दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान गणेश शेटे याचा शोध घेण्यासाठी राहुरी शहरात आले होते. त्यावेळी गणेश शेटे हा तरूण पाच नंबर नाका, खळवाडी येथील त्याच्या घरी एकटाच होता. पोलिस पथक पकडण्यासाठी आल्याची चाहूल लागताच गणेश शेटे याने घराचा दरवाजा आतून बंद केला. आणि घरातील छताला असलेल्या फॅनला दोरी बांधून गळफास घेतला.

सदर घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील, सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे, हवालदार बाबासाहेब शेळके, आजिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, सुरज गायकवाड, सचिन ताजणे आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गणेश बाळासाहेब शेटे याचा यास घरातून बाहेर काढले. यावेळी गणेश शेटे याच्या नातेवाईकांनी गणेशला मृत अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. त्यानंतर गणेश शेटे याला रुग्णवाहिकेमधून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. गणेश शेटे याच्यावर रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदन सुरु होते. तर राहुरी पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. यावेळी शहरातील शेकडो तरुणांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मात्र या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली. शेटे यास पोलिसांचे कोणते पथक अटक करण्यासाठी आले होते.याची चौकशी केली असता राहुरी पोलिस ठाण्यातून पथकाची माहिती देण्यास नकार दिला.