विश्वचषक संघाला बीसीसीआयकडून प्रत्येकी पाच कोटींचे बक्षीस

वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सत्कार समारंभात बीसीसीआयने टी-20 विश्वचषक विजेत्या हिंदुस्थानी संघाला तब्बल 125 कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान केले. या रॊकमेचे वाटप कसे होणार? याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली आहे. बीसीसीआयने दिलेली बक्षिसाची रक्कम संघातील 15 सदस्य, 4 राखीव खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये वाटली जाणार आहे. संघातील प्रमुख 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी, चार राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजच्या धर्तीवर 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. 2007 नंतर प्रथमच हिंदुस्थानने टी-20 विश्वचषक जिंकण्याची किमया करून दाखवली. या विश्वविजेत्या संघाचे बुधवारी हिंदुस्थानात आगमन झाल्यानंतर बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांच्या बक्षिसाचा धनादेश सुपुर्द केला होता.

 खेळाडूंना कसे दिले जाते बक्षीस?

खेळाडूंना दोन प्रकारे पैसे दिले जातात. प्रथम, व्यावसायिक शुल्काच्या स्वरूपात ज्या शुल्कावर ‘टीडीएस’ कापला जातो आणि कलम 194 अंतर्गत या रकमेवर टीडीएस कापला जाईल. मग हे पैसे खेळाडूंच्या उत्पन्नात परावर्तित करून आयटीआरमध्ये आयकर निश्चित केला जाईल. बक्षीस रकमेच्या रूपात दुसरे, ज्यावर 3 टक्के टीडीएस आधीच कापला जाईल. मग या परिस्थितीत, रकमेवर 30 टक्के कर कापून उर्वरित रक्कम खेळाडूंना दिली जाईल.

असे होऊ शकते बक्षिसाच्या रकमेचे वितरण

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बक्षिसाची रक्कम संघातील 15 प्रमुख सदस्य, 4 राखीव खेळाडू आणि संघाचे सपोर्ट स्टाफ यांच्यात वितरीत केली जाणार आहे. सपोर्ट स्टाफमध्ये 15 जण आहेत. त्यांनादेखील याचा फायदा होणार आहे. 15 प्रमुख खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी दिले जाऊ शकतात, तर सपोर्ट स्टाफ आणि चार राखीव खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची रक्कम दिली जाऊ शकते.