न्यूझीलंडविरुद्धच्या अपयशामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया कसोटी मालिकेत फलंदाजीसाठी हिंदुस्थानी संघात कुणाला संधी द्यायची, हा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून पर्थवर पहिला कसोटी सामना खेळला जाणार असून त्या संघात स्थान मिळवण्यासाठी हिंदुस्थान ‘अ’ संघ गुरुवारपासून मेलबर्नवर ऑस्ट्रेलिया ‘अ’ शी भिडणार आहे. या दुसऱया अनधिकृत कसोटीत के. एल. राहुल, अभिमन्यू ईश्वरनसुद्धा खेळणार आहेत आणि या दोघांच्याच कामगिरीवर संघ व्यवस्थापनाचे विशेष लक्ष असेल.
न्यूझीलंडकडून मात खाल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत हिंदुस्थानी संघात बदल अपेक्षित आहे. गेल्या दोन्ही कसोटींत सरफराज खान अपयशी ठरल्यामुळे त्याच्या जागी के. एल. राहुलला पुनरागमन करण्याची संधी आहे. फक्त मेलबर्नवर राहुलची बॅट लागायला हवी. तसेच अभिमन्यूलाही हिंदुस्थानी संघाचे चक्रव्यूह भेदण्यासाठी एमसीजीवर आपल्या बॅटची कमाल दाखवणे क्रमप्राप्त आहे. निवड समितीच्या लाडक्या राहुलला कसोटीत स्थान देता यावे म्हणून त्याच्या सोबत ध्रुव जुरेललाही मालिकेपूर्वी हिंदुस्थानी ‘अ’ संघातून खेळण्यासाठी पाठवले आहे. जुरेलवर निवड समितीचे किती लक्ष असेल याची कल्पना नाही, पण राहुलवरच साऱयांच्याच नजरा टिकल्या आहेत. या कसोटीत ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कलही मैदानात उतरणार आहेत. तेसुद्धा आपल्या दिमाखदार फलंदाजीच्या जोरावर ‘अ’ संघातून हिंदुस्थानी संघात झेप घेऊ शकतात.
एमसीजीवर हिंदुस्थानी संघात काही बदल अपेक्षित आहेत. इशान किशनच्या जागी जुरेल यष्टिरक्षण सांभाळेल. बाबा इंद्रजीतला बसवून राहुल संघात खेळेल. नवदीप सैनीलाही वगळून खलिल अहमद गोलंदाजी सांभाळेल आणि मानव सुतारच्या जागी तनुष कोटियनला अंतिम अकरामध्ये स्थान दिले जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या कामगिरीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही आपले लक्ष केंद्रित केले आहे. या संघात चांगली कामगिरी करणारा खेळाडू ऑस्ट्रेलियन कसोटी संघात हमखास दिसू शकतो. नॅथन मॅकस्विनी, सॅम कोणटासचा खेळ लक्षवेधी असल्यामुळे त्यांना चमकदार खेळ करून संघात स्थान मिळवता येऊ शकतो.