कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर बसवला; मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मोहम्मद अली मार्ग परिसराची वाहतूककोंडी फुटणार

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असणारा आणि पी.डी’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला महाकाय गर्डर शनिवार-रविवार मध्यरात्री ते पहाटेपर्यंत काम करून यशस्वीरीत्या बसवण्यात आला. यामुळे आता दुसरा गर्डर बसवण्याच्या कामाला गती मिळणार असून लवकरच पूल सुरू होणार असल्याने मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मोहम्मद अली मार्ग परिसराची वाहतूककोंडी फुटणार आहे.

लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पअंतर्गत 550 मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर 70 मीटरपर्यंत सरकवण्याची कार्यवाही गेल्या सोमवारी पूर्ण झाली. यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व शनिवार आणि रविवारी रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर गर्डर पूर्णपणे स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखडय़ानुसार व मध्य रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणअंतर्गत हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासह योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर  राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी हा गर्डर बसवला.

असे होते आव्हान

सुमारे 70 मीटर लांब आणि 9.50 मीटर रुंद आकाराच्या या गर्डरचे वजन सुमारे 550 मेट्रिक टन आहे. हा गर्डर बसवण्यासाठी रेल्वे रुळालगत तुळई पूर्णत: अधांतरी (कॅण्टीलिवर) होती. त्यानुसार गेल्या सोमवारी गर्डर पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकवण्यात आले, तर यानंतर हा गर्डर पूर्णपणे बसवण्यात आला आहे.

त्यानंतर गर्डरवर लोखंडी सळय़ा टाकून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल. यादरम्यानच पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे काम हाती घेतले जाणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत दुसरा गर्डर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.