डोंगरीत इमारतीच्या चार मजल्यांवर आग; अग्निशमन दलाने 40 जणांना वाचवले!

डोंगरीत आज एका बावीस मजली टोलजंग इमारतीमध्ये तब्बल चार ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. यात पंधराव्या मजल्यावर आग लागल्यानंतर आगीच्या ठिणग्या दहाव्या, चौदाव्या आणि एकोणीसव्या मजल्यावर उडाल्याने या ठिकाणीही आग लागली. मात्र आगीची माहिती मिळताच काही क्षणांत दाखल झालेल्या पालिकेच्या अग्निशमन दलाने तब्बल 35 ते 40 जणांना सुखरूप टेरेसवर नेत त्यांचा जीव वाचवला. यात चार जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.

डोंगरीच्या निशान पाडा रोडवर ‘अन्सारी हाइट्स’ ही 22 मजली इमारत आहे. या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर दुपारी 1 वाजताच्या सुमारास आगीचा भडका उडाला. या ठिकाणी किचनमध्ये काम सुरू असताना सिलिंडरचा स्फोट झाला. यात पती-पत्नी जखमी झाले असून त्यांना भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही आग भडकत जाऊन आगीच्या ठिणग्या 19 मजल्यावर उडाल्या. ठिणग्यांमुळे या ठिकाणच्या एसी काँप्रेसरचा स्पह्ट होऊन आग लागली. पुन्हा या आगीच्या ठिणग्या दहाव्या मजल्यावरही उडून तिथेही सिलिंडर स्पह्ट होऊन आग लागली. तर पंधराव्या मजल्यावरची आग सोळाव्या मजल्यावरही पसरली. बचावकार्य करीत असताना एक महिला जवानही जखमी झाली. त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाराव्या मजल्यावर एक 72 वर्षीय वृद्धाही धुराचा त्रास होऊन बेशुद्ध झाली होती. तिचीही सुटका अग्निशमन दलाने केली. त्यांच्यावरही जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, तब्बल चार तासांनी या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत अंजली जमदाडे, नासीर अन्सारी, समीन अन्सारी, सना अन्सारी हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

या इमारतीमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, इमारतीत अनधिकृत बांधकाम होते का आणि इमारतीत फायर फायटिंग सिस्टीम सुरू होती का, याची तपासणी अग्निशमन दला, पालिकेकडून केली जाणार आहे. या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्यास नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती अग्निशदन दलाने दिली.

असे वाचले रहिवासी

अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. रहिवाशांमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांनी एकच आरडाओरडा केला. चार मजल्यांवरील आगीमुळे आणि धुरामुळे रहिवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला. मात्र या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने रहिवाशांना सुरक्षितरीत्या तातडीने इमारतीच्या टेरेसवर नेले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांना सुरक्षितरीत्या इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. तर एक वृद्ध आणि बेडवरील रुग्णाला अग्निशमन दलाच्या जवानांनी कापडाची झोळी करून सुरक्षितरीत्या बाहेर काढले.