संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळीतप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आग लावली असावी, अशी तक्रार नाट्यगृहाचे अतिरिक्त व्यवस्थापक समीर इस्माईल महाब्री (वय 48, रा. शहाजी वसाहत, कोल्हापूर) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली आहे.

ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहास 8 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी अचानक आग लागली होती. या आगीत खासबाग कुस्ती मैदानाकडील मुख्य मंच आणि संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले होते. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खासबाग मैदानमधील स्टेजला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावली असावी. ती आग नाट्यगृहाच्या इमारतीस लागून त्यामध्ये नाट्यगृहाचे 16 कोटी 20 लाखांचे नुकसान झाल्याचे महाब्री यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजीव झाडे करत आहेत.