उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांचा जीव टांगणीला; चर्चांना उधाण, अफवांचा बाजार आणि भेटीगाठींना जोर

महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असून उद्या, 22 ऑक्टोबरपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. महायुतीचे जागावाटप जाहीर होण्याआधीच भाजपने थेट 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा केल्याने मिंधे आणि अजित पवार गटाची पळापळ सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी भाजपकडून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद असल्याच्या अफवा पद्धतशीरपणे सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांत पसरवून संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये गाठीभेटींना जोर आला आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत असून या निवडणुकीची अधिसूचना उद्या, 22 ऑक्टोबरला जारी होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत खरी लढत ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत देणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस विरुद्ध महायुती म्हणून लढणाऱ्या भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गट यांच्या असणार आहे. याशिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे, तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती, वंचित बहुजन आघाडी, मनसे, रासप हे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार, कोण कुणाकडून लढणार आणि कुणाचा पत्ता कट होणार, याची गणिते मांडली जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी महायुतीची दाणादाण उडवली. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी भक्कमपणे एकजुटीने पुढे जात आहे. विधानसभेच्या 288 जागांवर सक्षम उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे, कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक जिंकू शकतो आदी सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करून निवडणुकीची रणनीती ठरविली जात आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असताना सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांत जोरदार पतंगबाजीही सुरू आहे, परंतु आमच्यात कोणतेही वाद नाहीत असे शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आले आहे.

गटबाजी टाळण्यासाठी अजित पवारांनी वाटले एबी फॉर्म

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच अजित पवार गटाला गळती लागली आहे. शरद पवारांची साथ सोडून आलेले नेते एकामागून एक पुन्हा माघारी परतू लागले आहेत. विधानसभेची उमेदवारी मिळण्यावरून महायुतीमधील संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी जागावाटप जाहीर होण्याआधीच सोबतच्या आमदारांना मुंबईत बोलवून एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे.

‘सागर’वर नाराजांच्या लाटा

भाजपच्या पहिल्या यादीत नावे आली नाहीत ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धडकले व त्यांनी फडणवीसांना घेरले. वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, बोरिवलीचे आमदार सुनील राणे, पुण्याच्या खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, मावळमधील बाळा भेगडे यांची नावे पहिल्या यादीमध्ये नसल्याने ते फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. इच्छुकांचीही गर्दी झाली होती. मुंबादेवीतून लढण्यास इच्छुक असलेले अतुल शहा, अंधेरी पूर्व येथील मुरजी पटेल फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले होते. बबनराव पाचपुते आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा यासुद्धा सागर बंगल्यावर पोहोचल्या होत्या.