स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम बापाला 12 वर्षांची सक्तमजुरी

स्वतःच्याच चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आईच्या गैरहजेरीत वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी सुनावली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर 2021 रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महालेखानी यांनी करून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले. ऍड. स्मिता संस्कार यांनी साहाय्य केले. सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. पीडित मुलगी, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गहिनीनाथ खेडकर, संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया लोहारे यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या. अतिरिक्त सरकारी वकील गवते यांनी या खटल्यात सक्षम पुरावा न्यायालयासमोर आणत जोरदार युक्तिवाद करत आरोपीला शिक्षेची मागणी केली.

सरकार पक्ष आणि आरोपी वकिलाच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश घुमरे यांनी आरोपीला दोषी ठरवत बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागेल. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रवीण डावर, महिला पोलीस प्रतिभा थोरात, पी. एस. नाईकवाडी यांनी काम पाहिले.