नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-दुचाकीचा अपघात, पिता-पुत्राचा जागीच मृत्यू

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आसना नदीवर असलेल्या पुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपगातामध्ये पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले पिता-पुत्र अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ दाजीबा गाडे (वय – 45) आणि दाजीबा शंकरराव गाडे (वय 66) हे पिता-पुत्र दुचाकीवरून (क्र. एमएच 22, एजी 7822) अर्धापूरहून नांदेडकडे निघाले होते. नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आसना नदीवर असणाऱ्या पुलावर ही दुचाकी आली असता लातूरहून द्राक्ष घेऊन जाणाऱ्या आयशरने (क्र. एमएच 45, एई 8811) दुचाकीला धडक दिली. यात गोपीनाथ गाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे वडील दाजीबा गाडे हे पुलावरून खाली फेकले गेले. उंचावरून खाली फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस वसमत फाटा येथील जमादार व्यवहारे व त्यांच्या सहकार्‍यांनी येऊन अपघातग्रस्तांना नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेते. तिथे डॉक्टरांनी दोघांची वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस तपास सुरू आहे.