Kandahar plane highjack भाजपच्या सरकारनेच दहशतवाद्यांना सोडले, त्याचे परिणाम देश भोगतोय! फारुख अब्दुलांचा जोरदार हल्ला

24 डिसेंबर 1999 रोजी पाच दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या काठमांडूहून नेपाळला जाणाऱया विमानाचे अपहरण केले होते. या विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली होती. तत्कालीन भाजपच्या सरकारने ही मागणी मान्य करत तीन दहशतवाद्यांना सोडले. परंतु तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने हे एक चुकीचे पाऊल उचलल्याने त्याचे परिणाम आज संपूर्ण देश भोगतोय, अशा शब्दांत नॅशनल का@न्फरन्सचे नेते आणि जम्मू-कश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

1999 मधील विमान अपहरणावर आधारित अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आयसी 814 ः दी पंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज सध्या वेगवेगळय़ा कारणावरून गाजते आहे. आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा साऱ्या आठवणी ताज्या करत एनडीए सरकारला त्यांची चूक दाखवून दिली आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी पाच दहशतवाद्यांनी नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण केले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी विमान प्रवाशांना मुक्त करण्याच्या बदल्यात तत्कालीन भाजपप्रणीत एनडीए सरकारकडे मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्कात अहमद जरगर या तीन दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती.

मित्र बदलता येतात, पण शेजारी नाही

संबंध सुधारण्यासाठी आपण पाकिस्तानशी बातचीत करायला हवी, जी आपण करत नाही, परंतु आपण चीनशी का चर्चा करतोय? त्यांनी आपली जमीन बळकावली आहे. तेदेखील आपल्या जमिनीवर येऊन बसले आहेत. मग त्यांच्याशी चर्चा कशासाठी, असा सवाल फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. अटलबिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे, मित्र बदलता येतात, पण शेजारी बदलता येत नाहीत. आपण मित्र बनून राहू तर दोघेही विकसित होऊ. शत्रू बनून राहिलो तर दोघेही कमपुवत होऊ. हे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे मत होते, पण आताचे लोक शत्रुत्व घेऊन बसलेत, अशा शब्दांत फारुख अब्दुल्ला यांनी भाजपला टोला लगावला आहे.

रशीद इंजिनीयर यांना भाजपने सोडले

रशीद इंजिनीयर यांना भाजपने सोडले आहे. इथे मुस्लिमांचे तुकडे व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. यात भाजप रशीद यांच्यासोबत आहे, असा गंभीर आरोपही फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे.

काय म्हणाले अब्दुल्ला?

तीन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुश्ताक अहमद जरगर हा तेव्हा कश्मीरमधील तुरुंगात होता. जरगरला तुरुंगातून सोडण्यासाठी मी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता असे फारुख अब्दुल्ला म्हणाले, मात्र सरकारने अनेक विनंत्या करून जरगरला सोडण्यासाठी राजी करून घेतले. त्या दहशतवाद्यांना सोडून मोठी चूक केली होती. आज आपण बघतोय जगभर त्यांनी काय उच्छाद मांडलाय, असे अब्दुल्ला एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

मी त्यावेळी मुख्यमंत्री होतो. त्यांना म्हणालो होतो, या दहशतवाद्यांना सोडू नका, पण त्यांनी ऐकले नाही. हे लोक चुकांवर चुका करत आले आहेत. आजही हे लोक रोज नव्या चुका करून देश कमकुवत करत आहेत.